उपवासाला काय खावे ?

उपवास म्हणजे जवळ रहाणे. परमेश्वराच्या चिंतनाने स्वतः मधील परमेश्वराच्या अंशाला ओळखणे म्हणजे उपवास.
पण सध्या पहातो तिथे उपवास हा एक event झाला आहे असं वाटतंय. विशेषतः महाशिवरात्री निमित्त तर अनेक उपहारगृहांच्या बाहेर उपवासाच्या विशेष खाण्याचे बोर्ड लागलेयत. उपवासाचे खाणे की खाण्यासाठी उपवास हेच समजत नाही. आणि दुसऱ्या दिवशी हमखास दवाखान्यात पित्त वाढून डोकेदुखी, जुलाब , उलट्या अशी लक्षणे घेऊन पेशंट येतात.
उपवासाचे अनेक पदार्थ मानले जातात. वरी , शिंगाडा , राजगिरा, साबुदाणा, शेंगदाणे, खोबरं , बटाटा , रताळी , कच्ची केळी …. आणि यापासून बनवलेले अनेक चविष्ट व चमचमीत पदार्थ. पुन्हा यामध्ये हिरवी मिरची चालते बरं का !
यापैकी साबुदाणा हा बद्धकोष्ठता करणारा आणि पचायला जड आहे. शेंगदाणे पौष्टिक असले तरी उपवासाच्या पदार्थांत ते अधिक प्रमाणात खाल्ले जातात.हिरवी मिरची पित्त वाढवते.इतर पदार्थ चांगले आहेत. पण…
हा पण… महत्वाचा! उपवासाच्या दिवशी हे पदार्थ खावेत हे बरोबर. पण हे फक्त उपवासालाच खावेत आणि यातील शक्य तेवढ्या सर्व पदार्थांचा समावेश एकाच दिवशी उपवासानिमित्त करावा असा काही नियम आहे का ? नाही ना ?
मग यातील कोणतेही २ पदार्थ निवडा आणि तेच खा.
उदा. वरीचा भात आणि रताळ्याची खीर किंवा शिगाड्याचा शिरा.
राजगिरा घावन आणि उपवासाची कच्च्या केळ्याची भाजी
हे असं काहीतरी दुपारी खा आणि सकाळी व संध्याकाळी फळे , ताक , दूध असा शक्य तितका द्रव आहार घ्या. किंवा एक पदार्थ सकाळी आणि संध्याकाळी एखादा पदार्थ. त्यामुळे पचनशक्तीवर ताण पडणार नाही. शरीरातील दूषित घटक बाहेर पडून पेशी पुन्हा ताज्यातवान्या होतील.
सकाळी साबुदाणा, दुपारी राजगिरा पुरी आणि उपवासाची भाजी , रात्री वरीची खिचडी आणि शिंगाडा शिरा … मध्ये मध्ये वेफर्स नाहीतर चिवडा …अरे उपवास आहे ना म्हणून फळं आणि दूध….त्या पोटाला आराम मिळायच्या ऐवजी over time करावा लागतो. आणि हे सगळं बनवण्यात आणि खाण्यात देवाचं नामस्मरण करायला वेळच कुठे रहातो ???
आवडतात आम्हाला उपवासाचे पदार्थ. मग खा की. नाही कुठे म्हटलं. दर सोमवारी किंवा गुरूवारी किंवा शनिवारी… तुम्हाला जमेल त्या आवडेल त्या वारी एक दिवस एक वेळच्या खाण्यात दर आठवड्याला खा उपवासाचा एक पदार्थ बनवून. …जमेल ना ?
मग या महाशिवरात्री पासून ठरवा की मला उपवास नक्की का करायचा आहे? जिभेचे चोचले पुरवण्यासाठी, पोटाला आराम म्हणून की देवाची भक्ती म्हणून??
देवाची भक्ती रोजच करायची असते. पण पोटाचा विचार करा. आणि पटलं तर forward करा 😊

वैद्या चंदाराणी बिराजदार
MD

0
Your Cart is empty!

It looks like you haven't added any items to your cart yet.

Browse Products